Pune News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ऑनलाइन मृत्यू प्रमाणपत्रासाठी ‘वेटिंग’

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ लागत असल्याचे मृतांच्या नातेवाईकांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे संबंधीतांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

16 ऑगस्ट 2020 रोजी बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोपट दाभाडे (वय 65, रा. तळेगाव दाभाडे) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 21 जुलै 2020 रोजी उपचारासाठी त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. जवळपास महिनाभर त्यांच्यावर उपचार झाले.

उपचारासाठी सुमारे 11 लाख रुपये बिल आल्याची माहिती पोपट दाभाडे यांचा मुलगा दिलीप दाभाडे यांनी दिली. पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण, या संकेतस्थळावर केवळ मार्च 2019 पर्यंतचाच डेटा उपलब्ध असल्याचे दिसून आले.

पुणे महापालिकेतर्फे सुमारे दीड वर्षाचा डेटा अपलोड करण्यात आलेला नाही. तर मृत्यू प्रमाणपत्राअभावी अनेक कामे रखडली असल्याचे दिलीप दाभाडे यांनी सांगितले.

दरम्यान, जन्म – मृत्यू विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, ज्युपिटर हॉस्पिटलने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती वॉर्ड ऑफिसला द्यायला हवी. त्यानंतर ती माहिती आमच्या विभागाकडे येते. ही माहिती नंतर महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाते.

त्यानंतर वॉर्ड ऑफीसमधून या दाखल्याची प्रिंट घेता येते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे ऑनलाईन मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हॉस्पिटलकडून तातडीने वॉर्ड ऑफीसला माहिती देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.