Pune News: सोनू सूदच्या नावाने सुरु केलेल्या मार्शल आर्टस् स्कूलमध्ये ‘वॉरिअर आजी’ मुलींना देणार आत्मरक्षणाचे धडे 

एमपीसी न्यूज – पुण्याच्या हडपसर येथील आजीबाईंचा लाठ्या-काठ्या सफाईदारपणे फिरवण्याचा एक व्हिडियो जुलै महिन्यात तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने या आजीबाईंना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनू सूदने दिलेला शब्द खरा करुन दाखवत   आजीबाईंच्या मदतीसाठी मुलींना आत्मरक्षण शिकवणारे प्रशिक्षण वर्ग सुरु करुन दिले आहेत.

वॉररिअर आजीने याबाबत अभिनेता सोनू सूद याचे आभार मानले आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफ्र असणाऱ्या मानव मंगलानीने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ८५ वर्षीय शांताबाई पवार या सोनू सूदचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये, “गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनू सूद ने वॉरियर आजी शांताबाई पवार यांच्यासाठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण वर्ग सुरु केलं आहे. या आजींचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

प्रवाशांसाठी देवदूत झालेल्या सोनूने या आजींनी इतर महिला आणि लहान मुलांना सेल्फ डिफेन्सचे धडे द्यावे या उद्देशाने हे प्रशिक्षण वर्ग सुरु केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोनू सूदचे आभार मानण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे नाव सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल असं ठेवण्यात आलं आहे. आपण या प्रशिक्षण वर्गाला लवकरच भेट देऊ असा शब्दही सोनूने दिला आहे.

सोनूने सुरु केलेल्या या प्रशिक्षण वर्गाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्रामवरुन सोनूचे कौतुक केलं असून त्याच्यामुळे आजींना मदत होण्याबरोबरच महिलांना स्वत:च्या संरक्षणाचे धडे घेता येणार असल्याने आनंद द्विगुणीत झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.