Pune News: ‘खडकवासला’तून 11 हजार 704 क्युसेक वेगाने विसर्गाला सुरुवात- महापौर मोहोळ

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ही चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आली आहेत.

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग सकाळी 10 वाजता 11 हजार 704 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरलेला असून आज दिवसभरात हा विसर्ग वाढवलाही जाऊ शकतो, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ही चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आली आहेत. धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

खडकवासला 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेत 10.65 टीएमसी (100 टक्के), वरसगाव 11.96 टीएमसी (93.27 टक्के), टेमघर 2.85 टीएमसी (76.77 टक्के) असा चारही धरणांत एकूण पाणीसाठा 27.42 टीएमसी म्हणजेच 94.08 टक्के आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी: 29.05 टीएमसी म्हणजेच 99.66 टक्के पाणीसाठा होता. ही आकडेवारी आजची सकाळी 6 पर्यंतची आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत आता तब्बल 27.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दोन वेळच्या पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्याची चिंता मिटली आहे. तर, शेतीसाठी दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.