Pune News: धरण क्षेत्रात पावसाचा वेग कायम, ‘खडकवासला’तून 9 हजार 416 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. मागील 10 दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग कायम असल्याने त्यामुळे आज दुपारी 12 वाजल्यापासून मुठा नदीपात्रातील विसर्ग 9 हजार 416 क्युसेक वाढवण्यात येत आहे. मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांनी आता अधिकची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

बुधवारपासून आजही (दि.13) धरणांत धुवांधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता कमी असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरणात 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेत 7.92 टीएमसी (74.37 टक्के), वरसगाव 7.76 टीएमसी (60.50 टक्के) आणि टेमघर 1.76 टीएमसी (47.46 टक्के) असा या चारही धरणांत एकूण पाणीसाठा 19.41 टीएमसी म्हणजेच 66.58 टक्के पाणीसाठा आहे.


गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. मागील 10 दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. या धरणांत 19 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची आता वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.


पुणे महापालिका धरणांतून वर्षाला सुमारे 18 टीएमसी पाणी उचलते. महिन्याला पुणेकरांना दीड टीएमसी पाणी लागते. आता शेतीला पाणी सोडण्यासाठी ही धरणे 100 टक्के भरणे गरजेची आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.