Pune News : आकडेवारी पाहूनच लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेऊ : अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे परत एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा रंगली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारलेली नाही. मात्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुण्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले, राज्यातील परिस्थितींचा आढावा घेतला जात आहे. आणखी 10 ते 15 दिवस आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला घेण्यात येईल. राज्याच्या समोर कोरोनामुळे कोणती स्थिती समोर येणार? त्यावरच निर्णय ही घेतला जाणार आहे. त्यामुळे आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही.

मी आज काही बोललो तर लोक जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकार्‍यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल. व्हेंटिलेटर बेड, साधे बेड हे खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते. आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली. तर पूर्ण क्षमतेनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.