Pune News : पुण्यात पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यास सर्वतोपरी सहकार्य करू : प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज : देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचाविण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. पुणे महापालिकेने या योजनेला चांगली गती दिली असून लवकरच गरिबांना ही घरे मिळतील. त्यामुळे या योजनेला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरण, वने आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी हडपसर स.न.106 व 89, खराडी स.न.57, वडगाव स.न.39 आणि हडपसर स.न. 106 येथे उभारण्यात येणाऱ्या 2900 सदनिकांची सोडत आज, शनिवारी केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती तंत्रज्ञान मंत्री जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली.

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ,खासदार गिरीश बापट, आमदार व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

केंद्रिय मंत्री जावडेकर म्हणाले, मराठीत एक नटसम्राट नाटक होऊन गेले, त्यात नट विचारतो कोणी घर देता का घर, पण केंद्र, राज्य आणि महापालिका एकत्र येऊन घर देत आहेत, हे वास्तव आहे. पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात येत आहे. शहरात जागेची अडचण असते.

त्यातुलनेने ग्रामीण भागात लवकर घर उपलब्ध होते. प्रत्येक घरात स्वच्छता गृह, विजजोड, नळ जोड देण्याचा प्रश्न सोडवला आहे. प्रत्येक घरात गॅस जोड, जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पउत्पन्न आणि गरीब कुटुबांच्या उन्नतिचा प्रयत्न करण्यात येत आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले, सामान्य माणसाचे हक्काचे घर असावे हे स्वप्न या योजनेतून पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने गरिबांना ही संधी प्राप्त होत आहे. योजनांमध्ये त्रुटी असतात. त्या दूर करून सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. या कामाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

आ.चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळेल हे टार्गेट पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. पुणे मनपाने या योजनेला चांगली गती दिली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील, यासाठी शुभेच्छा देतो.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, 6300 नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 2900 सदनिकांची सोडत झाली. यातून जे राहतील त्यांची सोडत पुढील प्रकल्पांच्या उभारणीच्या वेळी घेण्यात येईल. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सर्वसोयीयुक्त घर आठ लाख रुपयांत घर मिळणार आहे.

रुबल अग्रवाल यांनी प्रास्तविक केले तर सोडतीचे संचलन अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.