Pune News : शहरासह ग्रामीण भागाला पाणी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : भामा आसखेड धरणातून 2.67 टिएमसी पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी घेणार आहोत. त्यामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणांमधून तितकेच पाणी उचलून शेतीसाठी आणखी एक आवर्तन देता येईल, का यावर विचार सुरू आहे. त्यामुळे काहीही झालं तरी शहरासह ग्रामीण भागातील शेतीला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात   प्रमुख उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सध्या पुण्याला खडकवासला धरणसाखळीतील वसरगाव, पानशेत आणि टेमघरमधून 18.5 टिएमसी पाणी दिलं जात आहे. जवळपास 2 लाख एकर जमिनीला एक वर्ष पुरेल इतकं पाणी पुण्याला दिलं जात आहे. वाढत्या नागरीकरणामुळं पाण्याची मागणी वाढली आहे. त्यासाठी भामा आसखेड धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांच शिक्के काढून, पुनर्वसन करून धरण पुर्ण केलं.

या धरणातून 2.67 टिएमसी पाणी घेतलं जात आहे, तर खडकवासला धरणसाखळीतून तितकेच पाणी कमी उचलून शेतीसाठी आवर्तन वाढवता येईल, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने दिला आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याची बचत केल्यास शेतकऱ्यांना पाणी देण्यावर विचार केला जाईल.

_MPC_DIR_MPU_II

तसेच टाटा वीज निर्मिती प्रकल्प असलेल्या मुळशी धरणातून देखील 5 ते 7 टिएमसी पाणी पुण्यासाठी घेण्याचे विचाराधीन आहे. विकास करण्यासाठी प्रकल्प उभारले जातात. परंतु त्यामध्ये बाधित लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. प्रत्येकाचे पुनर्वसन, रोजरोटीचा प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

फडणवीस म्हणाले, नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना ही अनोखी भेट आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेशी सुसंवाद ठेवून धरण प्रकल्प मार्गी लावला. शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी धरणं बांधली गेली. पण त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन देखील केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीला पाणी देता येईल. त्यासाठी जायका प्रकल्प उभारला जाणार आहे.

पाणी हे जीवन असले तरी आर्थिक वस्तू देखील आहे. त्यामुळे जितका वापर तितके बील द्यावेच लागेल. त्यासाठी 24 बाय 7 मीटर पाणी योजना राबविली जात आहे. राज्याची तिजोरी पुण्याकडे म्हणजे अजितदादांकडे आहे, त्यांनी पुण्याला आवश्यक तो निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षीय मतभेद, वैचारीक संघर्ष न करता पुणेकरांच्या हितासाठी पक्षभेद विसरून एकत्र येणे ही आमची संस्कृती आहे. शेती, उद्योग आणि पिण्यासाठी पाणी योजना राबविण्यासाठी बचत देखील गरजेची आहे.

त्यामुळे श्रेय घेण्याची लढाई न करता, लोकहितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच महापालिकेत समाविष्ट 23 गावांसाठी निधी देखील पालकमंत्री पवार यांनी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.