Pune News: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ : अजित पवार

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार शरद रणपिसे, आमदार राहुल कुल, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. दिलीप कदम, आदि मान्यवरांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधीक गतीमान करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक असल्याचे सांगून पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब आहे. एका दिवसात एक लाखाहून अधीक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे. मात्र, लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.