Koregaon Bhima News : विजयस्तंभ परिसरातील जागेच्या ताब्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार- ऊर्जामंत्री डॉ. राऊत

एमपीसी न्यूज- महाविकास आघाडी सरकार विजयस्तंभ परिसराचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करील. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. जागा राज्य सरकारच्या ताब्यात यावी यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (शुक्रवारी, दि.1) भीमा कोरेगाव येथील ‘विजय स्तंभाला’ मानवंदना दिली. यानंतर त्यांनी वढु बु., तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. त्यावेळी राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले, न्यायालयीन लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी आणि राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे आणि दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आणि या समितीचे प्रमुख दादासाहेब अभंग हे गेले दोन दशके सतत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडी सरकारची पूर्ण साथ लाभेल, अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. या परिसराचे सौंदर्यीकरण असो की या विजयस्तंभाच्या इतिहासाला त्या मागील समाजकारणांना साजेसे दालने, संग्रहालय येथे उभारणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी नोंदवले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.