Pune News : दिवाळी पहाटसाठी उद्याने उपलब्ध होणार, आठवडी बाजारही सुरू करण्याचे निर्देश

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आठवडी बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.  अजित पवार म्हणाले, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने 1 कोटी 17 लक्ष लसीकरणाचा टप्पा गाठला आहे.

लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही पवार म्हणाले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी.

प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहा ठिकाणी विकेंड कोविड लसीकरणास सुरूवात करण्यात आली असून ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालीयन विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरण नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत 8 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 4 लाख 27 हजार लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.