Pune News : काय सांगता…काँग्रेसच्या वर्धापन दिनाला भाजपा नेत्यांची उपस्थिती !

एमपीसी न्यूज : 28 डिसेंबर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन.काँग्रेसच्या 135 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे खासदार गिरीश बापट तसेच भाजपचे पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व भाजप नेते अन् पदाधिकाऱ्यांनी सकाळी थेट काँग्रेस भवनात हजेरी लावली. यानिमित्ताने राजकीय विचारधारा, वैचारीक अन् पक्षीय मतभेद विसरून सुसंवाद साधण्याचा नवा पायंडा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

‘प्रेम नसले तर नसू द्या, पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे’, असे म्हणत खासदार गिरीश बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक भाजपा नगरसेवक, कार्यकर्ते यांचा मोठा ताफाच काँग्रेस भवनमध्ये दाखल झाला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांंनी सर्वांचे आगत स्वागत केले. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये हास्यविनोदाची मैफीलच जमली. गिरीश बापट व रमेश बागवे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पाडला.

बापट आणि बागवे यांनी जमवलेल्या हास्य मैफिलीत बीडकर, मोहोळ, मुळीक व काँग्रेसचे अविनाश बागवे, रमेश अय्यर, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर आदी मंडळींनी जोरदार साथ दिली.

‘पक्ष कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात. ते करताना मतभेद होतातच, पण ते वैचारिक असावेत. पुण्यात हे नेहमी पाळले जाते. तीच पुण्याची संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी आपण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो ते असेच कायम राहिले पाहिजे’, असे म्हणत खासदार गिरीश बापट यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.