Pune News : नाथाभाऊंना काय देणार, लिमलेटची गोळी की कॅडबरी – चंद्रकांत पाटील

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी समाधान होईल असं काहीतरी देऊ असं नाथाभाऊंना सांगण्यात आलं. पण मग नेमकं काय देणार, लिमलेटची गोळी की कॅडबरी असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, खर तर नाथाभाऊंनी जायलाच नको होते. भाजपमध्ये त्यांना योग्य तो सन्मान मिळत होता. त्यांच्या नाराजीवर काही ना काही मार्ग निघालाच असता. तरीही ते जात असतील तर त्यांना शुभेच्छा. जिथे जातील तिथे त्यांनी चांगलं काम करावं, अशा शब्दात पाटील यांनी एकनाथ खडसे यांना शुभेच्छा दिला.

पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काय द्यायचं हे अजून ठरलेले नाही. त्यामुळे दोन वाजताचा पक्षप्रवेश चार वाजेपर्यंत लांबला. तुमचं समाधान होईल असं काहीतरी देऊ असं त्यांना सांगण्यात आलं. पण मग नेमकं काय देणार, लिमलेटची गोळी की कॅडबरी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

समाधानी होण्यासाठी लिमलेटची गोळी ही देतात आणि कॅडबरीही देतात. पण नाथाभाऊ त्याने समाधानी होतील की नाही हे येणारा काळ ठरवेल, असेही पाटील म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.