Pune News : राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालकांना कधी मदत करणार ? : चंद्रकांतदादा पाटील

एमपीसी न्यूज : राज्यसरकार सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकत आहे. पण राज्य सरकार राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

पुणे शहर भाजपा, लायन्स क्लब इंटरनॅशनल, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या वतीने एम.आय.टी. कॉलेज रोड भवानीमाता मंदिर येथे रिक्षाचालकांना मोफत आरोग्य किट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी लायन्स क्लबचे नरेंद्र भंडारी, प्रांतपाल अभय शास्त्री, सुनीता चिटणीस, कोथरुड भाजपाचे अध्यक्ष पुनित जोशी,स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे रोहित शाह, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांच्यासह परिसरातील नागरिक रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, “कोरोनाच्या काळात रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. केंद्राने नोव्हेंबरपर्यंत रेशन दुकानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिले.

याशिवाय फेरीवाले आणि लघु उद्योगांना कर्ज योजना असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पण राज्य सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.