Pune News : ‘सीरम’कडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतोय… – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी पुणे महापालिकेने सीरम इन्स्टिट्यूटकडे लसीच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. सीरमकडूनही पुणे महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पुणे महापालिकेला लस मिळू शकणार नाही. अशावेळी केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही? असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केलाय. इतकंच नाही तर पुणे भाजपमध्ये दोन गट पडल्याचा आरोपही मोहन जोशी यांनी केला आहे.

पुणे भाजपमध्ये दोन गट पडले आहेत.एक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तर दुसरा खासदार गिरीश बापट यांचा असल्याचा दावा मोहन जोशींनी केलाय. त्यामुळेच गिरीश बापट दिल्ली दरबारी प्रयत्न करत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

तर दिल्लीत गिरीश बापटांची पत उरली नाही का? असा प्रश्न निर्माण झाल्याचा टोलाही जोशी यांनी लगावलाय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळवण्याबाबत केंद्राची परवानगी मिळायला भाजपचा अंतर्गत कलह कारणीभूत ठरत असल्याची टीका त्यांनी केलीय. पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका, केंद्रातून परवानगी मिळवा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केलीय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.