Pune News : कात्रज प्राणी संग्रहालयातील ‘त्या’ 4 काळवीटांचा का झाला मृत्यू ?

एमपीसी न्यूज : महापुरामध्ये राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पडलेल्या सरंक्षण भिंतीची दुरूस्ती न केल्यामुळे त्यामार्गे भटक्या कुत्र्यांनी काळवीटांच्या कळपावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सैरभैर धावणारे 4 काळवीट हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना काल (दि.6 जानेवारी) सकाळी घडली.

गेल्या वर्षी 25 सप्टेंबर जोरदार पाऊस पडला होता. त्यावेळी कात्रज तलाव तुडुंब भरल्यामुळे पाण्याच्या जोरदार लोंढ्यामुळे कात्रज प्राणी संग्रहालयाची संरक्षणभिंत तुटली होती. त्यानंतर त्याची दुरूस्तीची मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी त्या तुटलल्या भिंतीच्या मार्गातून भटकी कुत्री, जनावरे प्राणीसंग्रहालय परिसरात सहज ये-जा करत असतात.

काल (बुधवारी) सकाळच्या सुमारास 4 भटक्या कुत्र्यांनी 34 काळवीटांच्या कळपावर भुंकत हल्ला चढविला. अचानक भुंकण्याचा आवाज आणि एका काळवीटावर झडप घालणाऱ्या कुत्र्यांच्या गोंधळामुळे काळवीट सैरभैर होत धावताना एकमेकांना धडकले. यामध्ये दुर्दैवाने चार काळवीटांचे हृदय बंद पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. दरम्यान हल्लेखोर 4 कुत्र्यांपैकी 3 कुत्र्यांना पकडले असून 1 कुत्रा पळून गेल्याची माहिती कात्रज प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली.

पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा सुर्यवंशी पाटील म्हणाल्या, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात घुसून केलेल्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक कुत्र्यांनी हल्ला केल्याने, काळवीट सैरभर धाऊ लागले. यामध्ये एकमेकांच्या धडक झाली. त्यात कार्डियाक आरेस्ट आला. यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या संदर्भात माहितीकरीता पुणे महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.