Pune News: प्रगतीपथावरील स्त्री शक्तीने गरीब-गरजू भगिनींना सहयोगाचा हात द्यावा – डॉ. रघुनाथ कुचिक

एमपीसी न्यूज : कष्टकरी श्रमिक वंचित व शेतकरी कुटूंबातील महिला पोटाला चिमटा काढून आपली पुढील पिढी घडविण्यासाठी झटत आहेत. त्यांच्यात मला दुर्गचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दोन पावले मागे असलेल्या या गरीब अन वंचित भगिनींच्या उत्कर्षासाठी सहयोगाची भूमिका घ्यावी, असे मत महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केले.

प्रबोधन फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने समाजातील शिक्षण, आरोग्य प्रशासन समाजकारण इत्यादी परिघात कार्यरत तसेच कोरोना काळातही भरीव काम केलेल्या  महिलांच्या ‘गौरव आधुनिक दुर्गांचा ‘ गौरव सोहळ्यात कुचिक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या अनिता दीक्षित होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गीतांजली घोलप, प्रा प्रज्ञा कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिकारी संतोष दराडे, डॉ. ऋतुपर्ण शिंदे, अतुल दीक्षित, शिरीष फडतरे इ.मान्यवर उपस्थित होते.

कुचिक म्हणाले की, प्रबोधन फाऊंडेशन तुमच्या सोबत आहे. तसेच महिलांच्या वरील वाढते हल्ले चिंताजनक असून यासाठी घराघरातून सुयोग्य संस्कार अन मानवीय प्रबोधनाची गरज आहे. तसेच स्रीत्व-मातृत्व अन आदर्श भारतीय मातृसत्ताक संस्कृती ही संकल्पनाही त्यांनी विशद केली.

याप्रसंगी मेधा ताडपत्रीकर, शुभांगी चौधर, ज्योती पांडे, सुनीता नाशिककर, मनीषा जाधवर-दराडे , सुरेखा भालेराव, वैजयंती मगर, नीता थोरवे, मानसी सावंत या नऊ महिलांचा सन्मानपत्र, मानाची पैठणी भेट देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायत्री भागवत यांनी तर निवेदन प्रा देवीदास बिनवडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.