Pune News : येरवडा -शिक्रापूर रस्ता होणार सहापदरी; प्रस्ताव पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्याचे आदेश

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूरहा मार्ग सहा पदरी करण्यासंबधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) अधिकार्‍यांना शुक्रवारी दिले. याबाबत पवार यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यात येरवडा ते खराडी हा परिसर पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो.

नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहरातून जाणार्‍या ग्रेड सेपरेटर जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसीत करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी केली होती.

त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भात पीडब्लूडी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकिला आमदार टिंगरे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीडब्लूडीचे मुख्य कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकित नगररस्त्यावरील वाहतूकी कोंडीसंदर्भात चर्चा झाली. त्यात पवार यांनी येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करायचे यासंबधीचा आराखडा तयार करावा, अशी सुचना केली.

त्यासाठी जवळपास 3 हजार कोटींचा खर्च येईल असा अंदाज पीडब्लूडीच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला.

त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी या रस्त्यासाठी केंद्राकडूनही निधीची मदत घेता येईल असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी तात्काळ केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. पुणे-नगर रस्त्यांवरील येरवडा ते शिक्रापूरपर्यंत सहा पदरी रस्त्यासाठी केंद्रानेही निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती त्यांना केली.

या मागणीला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंबधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा असे सांगितले असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

त्याचबरोबर आळंदी रस्ता हा पालखी महामार्ग असल्याने विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरसाठीही केंद्राच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या सुचना पवार यांनी केल्या असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.