Pune News: सत्तेसाठी तुम्ही आंधळे बहिरे झाला आहात; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. लहान आणि गतिमंद मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. महिलांचा आक्रोश तुम्हाला ऐकू येत नाही का? तुमची संवेदनशीलता संपली आहे. सत्तेसाठी तुम्ही आंधळे, बहिरे झाला आहात, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज राज्यभरात निदर्शने करण्यात आली आहेत. पुण्यातही जिल्हाधिकारी  कार्यालयासमोरही निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल बोंडे, पुणे भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्यासह पुणे महापालिकेतील नगरसेवक, ज्येष्ठ महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनावर उपचार घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये गेलेल्या महिलांवर अत्याचार होत आहेत. कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या विनयभंगाच्या आणि बलात्कारांच्या घटनांची यादी देखील मोठी आहे. कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या महिला मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या पोलीस प्रमुखांना भेटून यासंबंधीचे निवेदनही दिले आहे. पण अद्यापही यामध्ये कुठलीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आहे.

हाथरसच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आरोपींना अटक केली. पण महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचाराचे काय? इथे घडणाऱ्या घटनांसाठी कॅन्डल मार्च, मशाल मोर्चा काढणार आहात की नाही? उद्धव सरकारने आता तरी जागे व्हावे, असे पाटील म्हणाले.

कोथरूड मतदारसंघातील भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनात पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह नगरसेविका, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कोथरूड येथे भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.