Pune News : हौस म्हणून पिस्टल जवळ बाळगणा-या तरुणास अटक 

एमपीसी न्यूज – हौस म्हणून गावठी पिस्टल जवळ बाळगणा-या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक कडून धनकवडी परिसरात शनिवारी (दि.26) हि कारवाई करण्यात आली. 

कुणाल दयानंद पाटोळे (वय 19, रा‌. मानसी अपार्टमेंट फ्लॅट नं 2,तळजाई पठार धनकवडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील अखिल तळजाई पठार, मित्र मंडळ गणपती मंदिराजवळच्या रस्त्यावर एक तरुण कमरेला गावठी पिस्टल लावून थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा 40 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याविरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींची चौकशी केली असता त्याने हौस म्हणून गावठी पिस्टल जवळ बाळगल्याचे सांगितले तसेच त्याने हे पिस्तूल कुत्र्याची पिल्ले विकण्याच्या व्यवसायातुन आलेल्या पैशातुन खरेदी केल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.