Pune News : सव्वा वर्षांचा कालावधी संपल्याने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष बदलाच्या चर्चेला उधाण !

एमपीसी न्यूज : सव्वा वर्षांचा कालावधी संपल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. सव्वा वर्षांच्या कालावधीच्या अटींवर ही पदे देण्यात आल्याचा दावा काही इच्छूकांनी केला असून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत उपमहापौर बदलल्या नंतर पुणे महापालिकेतील इच्छुकांनी गुढघ्याला बाशिंग बांधायला सुरुवात केली आहे.

महापौर पदाचा कालावधी कायदेशीरदृष्ट्या अडीच वर्षांचा आहे. मात्र, त्या आधीच राजीनामा घेण्यासाठी हे इच्छुक तयारीला लागले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत.

सध्या पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना बदलून नव्यांना संधी देण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. गतवेळी महापौर निवडीच्या वेळी काय ठरले, याची आठवण नेत्यांना सूचकपणे करून देण्यात येत आहेत.

मोहोळ यांच्या निवडीच्या वेळीच सव्वा वर्षाचा कालावधी ठरल्याचे पक्षातील विरोधक सांगतात. तर असे काही ठरले नसल्याचे मोहोळ समर्थकांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात महापौर मोहळ यांनी चांगले काम केल्यामुळे अडीच वर्षांचा कालावधी मिळावा अशी समर्थकांची इच्छा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. या बदलांसाठी खासदार गट आणि इतर आमदारही आग्रही असल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III