Pune News : जिल्ह्यातील शाळांबाबत अजित पवार यांचा मोठा निर्णय, पाहा काय म्हणाले..

एमपीसी न्यूज: जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानाच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी.

बूस्टर डोस देण्यासाठी सुविधा देण्याचे निर्देश

ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक अस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्या.

रुग्णांना उपचार सुविधा देण्याच्या सूचना

शहरी भागात वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकांशी नागरीक घरीच उचार घेत असले तरी कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवावी. कोविड रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयानाही कोविड रुग्णांना दाखल करून उपचार सुविधा देण्याच्या सूचना द्याव्यात. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे, असे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.