Pune News : ‘स्थायी’सह शिक्षण समिती अध्यक्ष निवडीवरुन भाजप, महाविकास आघाडी आमनेसामने

एमपीसी न्यूज – तब्बल 8 हजार 370 कोटी बजेट असलेल्या पुणे महापालिका स्थायी समिती तसेच शिक्षण समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी भाजपसह विरोधक महाविकास आघाडी आमनेसामने आल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर या पदासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीतर्फे बंडू गायकवाड यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे याच दिवशी काही वर्षांपासून रखडलेल्या शिक्षण मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

या साठी भाजपतर्फे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कालीनंदा पुंडे, महाविकास आघाडीतर्फे सुमन पठारे, तर, शिवसेनेतर्फे प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे.

5 मार्च रोजी या दोन्ही निवडणूक होणार आहेत. पुणे महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. सांगली महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने व्हीप बजावला आहे. यावरून या निवड प्रक्रियेत भाजपकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

रासने यांचा अर्ज दाखल करतेवेळी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, सभागृह नेता गणेश बिडकर, तर गायकवाड यांचा अर्ज दाखल करतेवेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, शिवसेनेचे बाळा ओसवाल आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.