Pune News : व्यापाऱ्यांच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाची साथ नियंत्रणात आली असूनही, राज्य सरकार व्यापा-यांना निर्बंधात सूट देत नाही. संपूर्ण आणि मिनी लॉकडाउनमध्ये शहरातील व्यापा-यांचे 75 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. व्यापाऱ्यांच्या संदर्भातील मागण्यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

मुळीक म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही. वेळेवर धोरणात्मक निर्णय घेण्याची धमक नाही. मंत्री जबाबदारीने निर्णय न घेता मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात. प्रशासकीय अनुभवाच्या अभावामुळे मुख्यमंत्री कोणताही ठोस निर्णय न घेता केवळ शब्दांच्या कोट्या करतात. त्यामुळे सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. या धोरण लकव्यातून सरकारने बाहेर पडून पुणेकरांवरील कोरोनाच्या निर्बंधातून तातडीने सूट देण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.’

दुकाने उघडण्याची वेळ सकाळी १० ते रात्री ८ करावी, शनिवार आणि रविवारी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, व्यापारी आणि कामगारांच्या लसीकरणाचे धोरण तयार करावे, व्यापाऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे, अशा मागण्या मुळीक यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.