Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी : रमेश बागवे

काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही कांदा बंदी तातडीने उठविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे बुधवारी (दि. 16 सप्टेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बागवे यांनी ही मागणी केली.

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महापालिकेतील गटनेते आबा बागुल, प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, माजी आमदार दीप्ती चवधरी, नगरसेवक अरविंद शिंदे, लता राजगुरू, अविनाश बागवे, रजनी त्रिभुवन, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाट, विशाल मलके, शिलार रतनगिरी, साहिल केदारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

लॉकडाऊन असताना शेतीत मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने अन्यायकारक ठरणारी कांदा निर्यातबंदी केली. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कांद्याला भाव मिळणार आहे, तर आपल्या देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचेही बागवे म्हणाले.

दरम्यान, ही कांदा बंदी तातडीने मागे घ्यावी, यासाठी आज काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्य भरात आंदोलन करण्यात येत आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.