Pune News : भामा आसखेड कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून मुख्य सभेत गोंधळ !

एमपीसी न्यूज : भामा आसखेड प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपा सोडून अन्य सर्वपक्षीय गटनेत्यांची नावे वगळल्याची बाब निदर्शनास आणत आज, सोमवारी पुणे महापालिका मुख्य सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.

कोरोना महामारीच्या कारणास्तव गेल्या 8 महिन्यांपासून पुणे महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभेत कामकाज झालेले नाही.

कोरोना लॉकडाऊन, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सर्व मुख्य सभा तहकुब करण्यात आल्या. त्या पार्श्वभुमीवर आज जवळपास 11 मुख्य सभांच्या विषयपत्रिका पटलावर होत्या.

राष्ट्रगान वंदे मातरम, श्रद्धांजली नंतर तहकुबी प्रस्ताव मांडण्यात आला. तत्पुर्वी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी भामा आसखेड कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत गटनेत्यांची नावे का वगळली याचा खुलासा करा, अशी मागणी केली.

त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला दरम्यान सभागृह नेते गणेश बीडकर आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रिका अद्याप छापलेली नाहीत, परंतु, त्यात सर्वपक्षीय गटनेत्यांची नावे असतील, असे आश्वासन दिल्यानंतर सभागृहातील गोंधळ थांबला.

यानिमित्ताने सर्वपक्षीय गटनेते आणि सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.