Pune News : कोरोना चाचणी अद्ययावत प्रयोगशाळा उभारा : विशाल तांबे

पुणे शहर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रदूर्भावाने ग्रस्त आहे. आजमितीस देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही पुणे शहरात आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्यावतीने कायमस्वरूपी कोरोना चाचणी अद्ययावत प्रयोगशाळा उभारावी , अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी सोमवारी (दि. 7) आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रदूर्भावाने ग्रस्त आहे. आजमितीस देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही पुणे शहरात आहे. महापालिकेच्या वतीने सातत्याने रुग्णांची चाचणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आरटीपीसीआर आणि अँटिजिन रॅपिड स्वब टेस्ट या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.

यापैकी आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट हे बीजे मेडिकल कॉलेज किंवा एन.आय.व्ही किंवा आय.सी.एम.आर यांच्याकडून पुणे महानगरपालिकेस दिले जातात. गेले अनेक दिवस शहरात वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पटीत यापुढील काळात प्रयोगशाळांकडून रिपोर्ट मिळण्याकरता उशीर होत आहे. किंबहुना ते मिळण्याकरता किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी आजमितीस लागत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पुणे महापालिकेने कायमस्वरूपी अद्ययावत चाचणी प्रयोगशाळा उभारणे ही आता शहराची आणि काळाची गरज बनली आहे. याच करता नायडू हॉस्पिटलच्या आवारामध्ये पुणे महापालिकेच्या वतीने करोना चाचणी प्रयोगशाळा कायमस्वरूपी उभी करण्यात यावी.

ज्यामुळे वाढणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव बघता मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर टेस्टिंग करणे हे महापालिकेला शक्य होणार आहे. या टेस्टिंगमुळे स्वतःच्या प्रयोगशाळेचा उपयोग लवकरात लवकर टेस्ट रिपोर्ट देण्यासाठी होणार आहे.

परिणामी शहरांमधला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यामुळे निश्‍चितपणे हातभार लागणार आहे. म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी स्वतःच्या मालकीची प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी विनंतीही विशाल तांबे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.