Pune News : मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे तातडीने खुली करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, का असा सवाल करीत राज्य सरकारने तातडीने मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे सुरू करावीत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. 

मुळीक म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबरच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने सहभागी होऊन हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. पुरोगामी आणि धर्मनिपेक्षतेचा बुरखा पांघरलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दबावामुळे मुख्यमंत्री मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाहीत. त्यांना सत्ता टिकवण्यात स्वारस्य आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘श्रावण महिना सुरू झाला असताना भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही ही खेदाची बाब आहे. अन्य राज्यातील धार्मिक स्थळे खुली आहेत. सरकारने नागरिकांच्या भावनांशी खेळू नये. धार्मिक स्थळांशी संबंधित सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाने तातडीने मंदिराची दारे खुली करावीत अन्यथा तीव्र जनआंदोलन केले जाईल.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.