Pune News: ससून रुग्णालयाकडून स्वत्रंतपणे जन्म व मृत्यू दाखला देण्याच्या निर्णयामुळे महापालिकेचा ३० टक्के ताण कमी

एमपीसी न्यूज: ससून रुग्णालयात जन्म घेणाऱ्या बाळाची किंवा उपचारा दरम्यान मृत्यू होणाऱ्या व्यक्तीची नोंदणी महापालिकेच्या जन्ममृत्यू कार्यालयात होऊन त्यांना दाखला मिळत होता. मात्र, आता ससून रुग्णालयाकडून १ जानेवारी पासून स्वतंत्रपणे जन्म व मृत्यूचा दाखला देण्याची स्वतंत्र व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.

या व्यवस्थेमुळे महापालिकेवरील कामाचा ३० टक्के ताण कमी झाला आहे. तसेच पुण्याबाहेरील नागरिकांना महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत नाहीत. शहरात जन्म घेणाऱ्या व मृत्यू झालेल्या नागरिकांची नोंदणी करून घेणे व त्याचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. पूर्वी हे दाखले देण्याचे काम कसबा पेठेतील कार्यालयातून केले जात होते. आता शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये याचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होत नाही व नागरिकांना रुग्णालयाच्या किंवा घराजवळील क्षेत्रीय कार्यालयात जाऊन जन्म-मृत्यू दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करता येते.

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ससून रुग्णालय आहे. या ठिकाणी पुण्यासह पुणे ग्रामीण व इतर जिल्ह्यांमधील नागरिक उपचारासाठी येतात, महिला प्रसुतीसाठी येत असतात. त्यामुळे अशांची जन्म किंवा मृत्यूची नोंद ही ससून रुग्णालयाच्या माध्यमातून महापालिकेकडे होते.

पुणे शहरात वर्षभरात सुमारे ३५ हजार मुलं जन्माला येतात. तर ३० हजार नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये ससून रुग्णालयातील जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या सुमारे १० हजार तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या ९ हजार इतकी आहे. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून ससून रुग्णालयात जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी उपनिबंधकांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव होता. त्यास राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. शहराच्या एकूण जन्ममृत्यूच्या संख्येच्या प्रमाणात सुमारे ३० टक्के प्रमाणपत्र ससून रुग्णालयातील असतात. हे दाखले काढण्यासाठी नागरिकांना महापालिकेचे कार्यालय गाठावे लागत होते. आता ही सेवा ससून रुग्णालयाच्या आवारातच उपलब्ध होत आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.