Pune News : महापालिकेच्या मिळकतींची होणार चौकशी

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास, भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज संबंधित खात्यांना दिले आहेत.

रासने म्हणाले, आज स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पूर्वी महापालिकेच्या भवन विभागामार्फत 266 मिळकती भाड्याने दिल्या आहेत. जवळजवळ 1625 भाड्याने दिलेल्या मिळकतींची गेल्या वर्षी मार्च अखेरची थकबाकी 34 कोटी 48 लाख रुपये इतकी आहे. या वर्षी एप्रिल 2021 ते मार्च 2022 अखेरची भाड्याची थकबाकी 18 कोटी 92 लाख रुपये इतकी होते. म्हणजेच एकूण 1981 भाड्याने दिलेल्या मिळकतींची भाड्याची थकबाकी एकूण 53.50 कोटी रुपये इतकी आहे. ही अतिशय गंभीर बाब असून महापालिकेचे महसुली उत्पन्न बुडत आहे.

रासने पुढे म्हणाले, ‘महापालिकेच्या विविध विभागांकडून विकसित करण्यात आलेल्या मालमत्ता वर्षानुवर्षे वापराविना पडून आहेत. अनेक मिळकतींचा करार झालेला नाही, काही मिळकतींवर अर्धवट बांधकाम झालेले आहे. अनेक मिळकतींवर अतिक्रमण झालेले आहे, करारानुसार वापर न होणा-या मिळकतींची संख्या खूप मोठी आहे. अनेक मिळकतींच्या भाड्याची वसुलीच होत नाही. अशा सर्व मिळकती शोधून काढून त्या ताब्यात घेऊन जागा वाटप वितरण नियमावलीनुसार त्याचे वितरण करण्याचे आदेश दिले.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.