Khayal Yadnya News : ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवाचे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’संगीत महोत्सवाचे उद्घाटन पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सकाळी दीपप्रज्वलन करून आणि पं. भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव होत आहे.

पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा सन्मान पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आला.

‘कलाकारांना पिढ्यानपिढया सन्मान मिळावा, कला वृद्धींगत होत राहावी, आणि त्यांची मेहनत सुफळ संपन्न व्हावी, अशी सदिच्छा पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी छोटेखानी भाषणात व्यक्त केली.

उद्घाटनप्रसंगी पं. उदय भवाळकर, पं. विजय घाटे, पं. उल्हास कशाळकर, पं. विकास कशाळकर, पं. अतुलकुमार उपाध्ये, पुनीत बालन, श्रीकांत बडवे, श्रीपाद चितळे, गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील व्यासपिठावर उपस्थित होते.

उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 12 ते 14 फेब्रुवारी 2021 सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सव होणार आहे. या महोत्सवात देशातील दिग्गज तसेच नवोदित मिळून 39 कलाकारांचे सादरीकरण होत आहे. 39 गायक, 14 तबला वादक, 10 पेटीवादक , 1 सारंगी वादक, 4 निवेदक यांचा सहभाग हे या संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.