Pune News : ‘पुणे नव्हे महापुणे’ ; राज्यात आता पुणे महापालिका सर्वात मोठी !

एमपीसी न्यूज : हद्दीलगतची 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना राज्यसरकारने प्रसिद्ध केली. 23 गावे महापालिकेत आल्यामुळे पुणे महापालिका ही राज्यातील सर्वांत मोठ्या शहराची महापालिका झाली आहे.

राज्यात सर्वांत मोठी बृहन्मुंबई महापालिकेची हद्द 475 चौरस किमी आहे. आता पुणे महापालिकेची हद्द 485 चौरस किलोमीटर झाली आहे. त्यामुळे ‘पुणे नव्हे महापुणे’ असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पुण्याच्या हद्दीलगतची 34 गावे पालिकेत समाविष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत राज्य शासनाने 2017 मध्ये आपली भूमिका मांडताना पहिल्या टप्प्यात 11 गावे, तर, उर्वरित 23 गावे पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

त्यानुसार 4 ऑक्टोबर 2017 मध्ये 11 गावे हद्दीत समाविष्ट झाली. त्यापूर्वी महापालिकेची हद्द सुमारे 282 चौरस किलोमीटर होती. ती 333 चौरस किलोमीटर झाली. आता तीन वर्षांनी उर्वरित 23 गावे पालिकेत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार या गावांचा समावेश झाल्यामुळे महापालिकेची हद्द तब्बल 152 चौरस किलोमीटरने वाढणार आहे. यापुर्वी ही 23 गावे ‘पीएमआरडीए’कडे होती.

राज्यशासनाने तीन वर्षांपूर्वी पालिकेत 11 गावे दिली, तरी त्याच्या दोन वर्षे आधी ही गावे ‘पीएमआरडीए’मध्ये होती. त्यामुळे या गावांमध्ये बांधकामांना त्यांच्याकडून मान्यता देण्यात आली. तसेच सेवाक्षेत्रांच्या जागाही त्यांनीच ताब्यात घेतल्या.

त्यामुळे महापालिकेस गावांमधून बांधकाम विकास शुल्कातून काहीच मिळाले नाही. शिवाय या गावांत तातडीने सुविधाही द्याव्या लागल्या. त्याच्या खर्चाचा भार पालिकेवर येत आहे.

सद्य:स्थितीत या 23 गावांमध्ये नागरी सुविधा देण्यासाठी जागाच शिल्लक नाहीत. शिवाय अतिक्रमणे, अरुंद रस्ते अशी स्थिती आहे. त्यामुळे ही गावे आल्यास या गावांना रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा पायाभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेस प्राथमिक अंदाजानुसार, तब्बल 9 हजार कोटींच्या निधीची गरज आहे.

राज्यसरकारने ही 23 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असला तरी निधी पण द्यावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.