Pune News : महावितरणच्या पुणे परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे परिमंडलातील वर्ग एक व वर्ग दोनमधील अभियंता व अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

मुख्यालयाने ठरवून दिलेले निकष व नियमावलीच्या आधारे प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये थेट ग्राहकसेवा देणाऱ्या 42 उपविभाग, 168 शाखा कार्यालयप्रमुख अभियंत्यांच्या सर्वच जागा भरण्यात आल्या असून एकही जागा रिक्त ठेवण्यात आली नाही, हे विशेष.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बदली धोरणात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रशासकीय व विनंती बदल्यांचे प्रमाण मुख्यालयाकडून ठरवून देण्यात आले होते. तसेच विनंती बदल्यांचे निकष आणि त्यासंबंधी गट एक ते चारमध्ये प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आले आहे. सोबतच संस्थामक कार्यक्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने बदलीद्वारे योग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची योग्य ठिकाणी बदलीचे अधिकार संबंधीत परिमंडलातील स्थानिक बदली समितीला देण्यात आले.

पुणे परिमंडल अंतर्गत महावितरणच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यामध्ये एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची तसेच महसूलवाढ, थकबाकी वसुली, वीजपुरवठा व दर्जेदार ग्राहकसेवा या दैनंदिन कामकाजासाठी कोणत्याही कार्यालयांमध्ये असमतोल राहू नये, याची दक्षता घेण्यात आली.

ग्राहकसेवेशी थेट संबंधित असलेली महावितरणच्या उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये रिक्त पदे राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. सोबतच तसेच वर्ग तीन व चारमधील तांत्रिक कर्मचाऱ्यांची रिक्तपदे संबंधित मंडल कार्यालयांकडून कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रमाणात झालेल्या प्रशासकीय व विनंती बदल्यांमध्ये महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत कोणत्याही शाखा व उपविभाग कार्यालयप्रमुखांचे पद रिक्त ठेवण्यात आलेले नाही, हे उल्लेखनीय.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह प्रामुख्याने राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील ग्रामीण तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागातील कार्यालयांमध्ये ग्राहकसेवेसाठी अभियंत्यांच्या बदलीमध्ये समतोल साधण्यात आला आहे. पुणे परिमंडलअंतर्गत बदल्या झालेले सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी संबंधीत ठिकाणी ग्राहकसेवेसाठी रुजू झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.