Pune News : वृत्तछायाचित्रकार अनिल देशपांडे यांचे निधन      

एमपीसी न्यूज – धडाडीचे छायाचित्रकार अनिल रामचंद्र देशपांडे यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, छायाचित्रकार चिरंजीव अजय आणि अमित तसेच कन्या अश्विनी आणि जावई अभिजित कुबेर, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून ते वृत्तपत्र छायाचित्रकार या नात्याने प्रसिद्ध होते.

अनेक महत्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार होते. मराठी मुलांना ट्रेकिंगची गोडी लावून त्यांनी मारुती चित्तमपल्ली यांच्यासह अनेक दिग्गजांची भेट घडवून आणली आहे. महत्वाच्या कुस्त्या असोत ,की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अनिल देशपांडे यांनी काढलेली छायाचित्रे ही चर्चेत असत. ज्या काळी फॅक्स, इ-मेल, व्हॉट्सअ‍ॅप अशा कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या किंवा  वृत्तछायाचित्र पाठवावयाची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती तेव्हा त्या छायाचित्रांना वेळेत वृत्तपत्र कार्यालयात नेऊन पोचते करण्याची जिद्द त्यांनी कायमच दाखवलेली होती.

दूरदर्शनवरून सर्वप्रथम विम्बल्डनच्या महिला एकेरी आणि पुरुष एकेरी सामन्यांचे प्रक्षेपण सुरु झाले तेव्हा विम्बल्डन विजेता किंवा विजेती हे त्यांच्याच कॅमेऱ्यातून दूरचित्रवाणीवरून टिपले जात.  बोर्ग विरूद्ध जॉन मॅकेन्रो यांच्यात झालेल्या चुरशीच्या विम्बल्डन स्पर्धेचे अंतिम क्षण त्यांच्याच कॅमेऱ्याने टीव्हीवरून टिपले होते. 1980 ची ती लढत उत्कंठापूर्ण होती.

25 जून 1983 रोजी भारत आणि आधीचा जगज्जेता संघ वेस्ट इंडिज यांच्यातील प्रुडेन्शियल विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विजयी झाल्यावर भारताचा कर्णधार कपिल देव यांनी उंचावलेल्या विश्वचषकाचे रात्री उशिराचे चित्रही त्यांनी याच कल्पकतेने टीव्हीवरून टिपलेले होते. अनेक वाचकांच्या चर्चेचे ते छायाचित्र होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात आपल्या गायन, वादन वा नृत्य या कलांना सादर करणाऱ्या कलाकारांच्या उत्तमोत्तम भावमुद्राही त्यांनीच टिपलेल्या होत्या. दंगलींच्या काळातही जिवावर उदार होऊन गर्दीतून वाट काढत पुढे जाणारे देशपांडे वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे आपल्या चित्रांमधून व्यक्त होत असे. त्यांच्या निधनाने एक धडपडे वृत्तछायाचित्रकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.