Pune News : आता तरी पुण्यात शिथिलता द्या, महापौर मुरलीधर मोहोळ यांचे राज्य सरकारला साकडे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्र्यांनी शिथिलता देण्याबाबत जे विधान केले आहे, त्यासंदर्भात लवकर आदेश काढावेत, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पुणे शहरात शिथिलता देण्यासंदर्भात मी गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यावर निर्णय का होत नाही माहीत नाही, अशी खंत मोहोळ यांनी या वेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता. २ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर होते. त्यांनी आज सांगलीमध्ये बोलताना, जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येईल, असे म्हटले होते. यावरुन मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याबाबतही लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.

“पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांच्या खाली आहे. त्यामुळे शहर लेव्हल 2 मध्ये आहे. तरी शिथिलता दिली जात नाही. राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे शहरातील लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे”, असेही मोहोळ यांनी सांगितले.

‘राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तेथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली येथे म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.