Ganeshutsav 2020 : राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे 127 वे वर्ष  : यंदा ऑनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रम

एमपीसीन्यूज : अखिल मंडई मंडळाच्या 127 वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा येत आहे. दुपारी 12 वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना झाली.

अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला.

यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरेश थोरात, विक्रम खन्ना, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर आदी उपस्थित होते.

यंदा ऑनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी 7.30 वाजता महाआरती होणार आहे.

महाराष्ट्रभरातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे उत्सवकाळात 24 तास ऑनलाईनदर्शनाची सोय करण्यात आली आहे.

मंडळाच्या akhilmandaimandal.org या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अण्णा थोरात म्हणाले,  दरवर्षी उत्साहात आणि सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेऊन अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत असतो.

127 वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. परंतु गणेशोत्सव हा समाजासाठी आहे. समाजातील लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आम्ही गणेशोत्सव साजरा करणार आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे अधिक काळजी घेण्यात येणार आहे. कमीत कमी गणेशभक्त मंदिरात असतील. यासोबतच प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे. त्याशिवाय ऑक्सीमीटर आणि थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे.  येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.