Pune News: पुणे रेल्वे विभागात नोव्हेंबर महिन्यात 31 हजार फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी 40 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागात तिकीट तपासणी मोहिमेत नोव्हेंबर महिन्यात 30 हजार 976 फुकट्या प्रवाशांना पकडले आहे. त्यांच्याकडून एक कोटी 40 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे विभागात रेल्वे विभागाकडून तिकीट तपासणी मोहीम सुरु आहे. रेल्वे विभागाकडून सर्व रेल्वे गाड्यांमध्ये, रेल्वे स्थानकावर ही मोहीम राबवली जाते. नोव्हेंबर या एका महिन्यात तब्बल 30 हजार 976 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले आहे. त्यांच्याकडून एक कोटी 40 लाख 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच बुकिंग केलेले नसतानाही रेल्वे स्थानकावरून पार्सल विभागातून सामान घेऊ जाणा-या 104 जणांकडून 18 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत पुणे रेल्वे मंडळाने विना तिकीट प्रवास, अनियमित प्रवास करणा-या एक लाख सात हजार प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चार कोटी 49 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, वाणिज्य विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एस वी एन सुभाष यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा विभागाने केली.

रेल्वे विभागाकडून तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरु आहे. प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आपले रेल्वे तिकीट कन्फर्म आहे का, हे तपासावे. कन्फर्म तिकीट नसेल, तिकीट काढले नसेल तर अशा प्रवाशांना आर्थिक दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास कारागृहात जाण्याची देखील वेळ येऊ शकते, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.