Pune News : पर्यावरणपूरक हौदांवर खोटा आक्षेप घेणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाहीत : महापौर

आक्षेप घेण्यात आलेले हौद हे गणेश विसर्जनासाठीचेच असून ते गेल्या वर्षीही वापरण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक फिरत्या हौदांवर खोटा आक्षेप घेण्याचा आणि पर्यायाने वस्तुस्थिती समजून न घेता शहराची बदनामी करण्याचा प्रकार ओंगळवाणा आहे. खोटे आरोप करून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाहीत, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनसेला सुनावले.

आक्षेप घेण्यात आलेले हौद हे गणेश विसर्जनासाठीचेच असून ते गेल्या वर्षीही वापरण्यात आले होते. केवळ माती आणि निर्माल्य दिसलं म्हणून कचऱ्याचे कंटेनर आहेत, असा दावा करणे अस्वस्थ करणारे आहे.

जर कंटेनर कचऱ्याचा असता तर त्याला खाली पाण्याचं आऊटलेट कसं असेल? एवढं बेसिकही न कळावं ?, असा सवालही महापौरांनी मनसेला केला.

माध्यमांच्या कॅमेरासमोर सर्व वस्तुस्थिती समोर आणली असून कचऱ्याचे कंटेनर आणि विसर्जन हौद याचे दोन्ही प्रकार समोर दाखवले. आता यापुढे असे गलिच्छ आरोप होणार नाहीत, यासाठी बाप्पाकडेच प्रार्थना करुयात, असेही महापौर म्हणाले.

पुणे शहरात गणेश विसर्जनासाठी कचऱ्याचे कंटेनर असल्याचा आरोप मनसेचे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी केला होता. या प्रकरणी आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.

आयुक्तांनीही कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे कंटेनर वापरू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

पुणे शहरात 5 ते 6 लाख घरगुती गणपतीचे विसर्जन होते. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेतर्फे कोणत्याही उपाययोजना करण्यात आले नसल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.