Pune News : रा. स्व. संघ राष्ट्रद्रोही संघटना आहे का ?; चंद्रकांत पाटील यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल

एमपीसीन्यूज : देशावर जेव्हा संकटे आली, त्या-त्या वेळी रा. स्व. संघानेच पुढाकार घेऊन याचा मुकाबला करुन देशाला संकटातून बाहेर काढले. कोरोनाच्या संकटातही संघाचे स्वयंसेवक कोविड योद्ध्यांसोबत जीव पणाला लावून काम करत आहेत. तरीही गृहमंत्री संघावर टीका करत आहेत.‌ संघ राष्ट्रद्रोही संघटना आहे का ?, असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारला.‌

क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी पुण्यातील नागरिकांच्या RTPCR आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. त्या व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्यात पाटील बोलत होते.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रा. स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे, महापालिका सभागृह नेते गणेश बीडकर, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, प्रतिक देसरडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा संघच पुढे आला.‌ संकटसमयी संघच नेहमी धावून येतो. कोविडच्या काळातही अन्नधान्य वाटप, गोर-गरीब कुटुंबांना भोजन व्यवस्था, कोविड बाधितांसाठी केअर सेंटर सुरू करणे, एवढेच नाही; तर अंत्यविधीसाठी देखील संघ स्वयंसेवक पुढे येऊन काम करत आहेत. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मध्यंतरी म्हणाले होते की, पोलीस सेवेतील संघ स्वयंसेवकांना आम्ही शोधून काढू. संघ काही दहशतवादी संघटना आहे का ?.

पाटील पुढे म्हणाले की, कोविडच्या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. हरभजनसिंह, सुधीर मेहता हे त्यापैकी एक आहेत. या दानशूर व्यक्तींनी कोविडच्या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी जो आर्थिक भार उचलावा लागणार आहे, तो उचलण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे आपला देश नक्की या संकटातून बाहेर पडेल.

जगदीश मुळीक म्हणाले की, पुणे शहर कोरोनामुक्त करण्याचा भाजपाचा निर्धार असून, यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि रा. स्व. संघाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या हातात हात घालून काम करत आहेत. यासाठी कोविड टेस्टिंगची ही व्हॅन अतिशय महत्त्वाचे आहे.

क्रिकेटपटू हरभजनसिंह म्हणाले की, महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायचं असून‌, याचे कर्णधार म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर जबाबदारी आहे.‌ त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील मॅच जिंकू.

लोकार्पण झालेल्या व्हॅनच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचण्या 500 रुपयात आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या 250 रुपयात करण्यात येणार आहेत. तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबांतील व्यक्तींची मोफत टेस्ट करण्यात येणार आहे. दररोज दीड हजार आरटीपीसीआर आणि सहा हजार अँटिजेन टेस्ट या लॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.