Pune News : सक्तीची वीज बिल वसुली ताबडतोब थांबवा : आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसीन्यूज : कोविडची साथ, टाळेबंदी अशा कारणांनी अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. अशावेळी वीज बिलं कशी भरावीत अशी समस्या नागरिकांसमोर असताना महावितरण मात्र, सक्तीने वीज बिलांची वसुली करीत आहे. ती वसुली ताबडतोब थांबवावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांची भेट घेऊन आमदार शिरोळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मागण्यांचे पत्रही दिले. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, तसेच मतदारसंघाचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र साळेगांवकर, गणेश बगाडे, अपूर्व खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वीज बिलाची सक्तीची वसुली करण्याऐवजी ग्राहकांना हप्ते बांधून द्यावेत. हॉटेल आणि जिम उद्योगाला वीजेच्या बिलात 40 टक्के सूट आणि व्याज माफी देण्यात यावी, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

पाटील इस्टेट झोपडपट्टीत वर्षभरापूर्वी आग लागली होती. त्या आगीत अनेकांचे वीज मीटर जळून खाक झाले आहेत. त्या जळीतग्रस्तांना लवकरात लवकर वीजेचे नवीन मीटर बसवून मिळावेत, असेही आमदार शिरोळे यांनी तालेवार यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.