Pune News : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना मिळणार वाव
विद्यार्थी सहायक समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामंजस्य करार
एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी सहायक समिती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या करारामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच अनेक नवीन गोष्टी शिकता येणार आहेत.
या सामंजस्य करारावर 16 जुलै रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रिया केळवकर, तुषार रंजणकार व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
या करारात नमूद केल्याप्रमाणे या विद्यार्थ्यांना या विविध कौशल्य आत्मसात करता येतील व त्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल अशा कामांमध्ये सहभागी करून घेण्यात येईल.
यामध्ये कागदी पिशव्या, कापडी पिशव्या खतनिर्मिती, औषधी वनस्पती लागवड, बांबूपासून विविध वस्तू बनविणे, विद्यापीठाचे बोधचिन्ह असलेल्या वस्तू बनविणे, त्याचबरोबर विद्यापीठाच्या मुद्रणालयतील विविध कामे प्रशासकीय कामे आदींचा समावेश आहे.