Pune: कोरोना संदर्भात पुढील महिन्याचा आराखडा दोन दिवसांत -आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोना संदर्भात पुढील एक महिन्याचा आराखडा येत्या दोन दिवसांत तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना दिले. या आराखड्यात कोरोनासाठी भविष्यात किती खर्च येणार, किती बेड लागणार, त्याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 

पुणे शहरात कोरोनाचे वाढत असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, शहर अभियंता, आरोग्य प्रमुख, मुख्य लेखापाल, आरोग्य, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर होत आहे. ते सोडवण्यात भाजपला अपयश आले आहे. पुढील 3 महिन्यांचा आराखडा तातडीने सादर करण्यात यावा. तसेच, महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर विमा कवच योजनेचा लाभ देण्यात यावा.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांना  वेळेवर बेड उपलब्ध होत नसून रुग्णांचे हाल होत आहेत, असे काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्तांनी पुणे शहरातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणेसाठी 24 बाय 7 मनपाचे अधिकारी 3 शिफ्टमध्ये खाजगी रुग्णालयात बसून त्याठिकाणी असलेले आयसोलेशन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर याची उपलब्धता दैनंदिन जाहीर करण्यात येईल.

प्रत्येक खाजगी रुग्णालयात असलेले अधिका-यांचे नंबर जाहीर करण्यात येणार आहे. पुणे मनपाचा डॅशबोर्ड तयार करून दैनंदिन पब्लिश केले जाईल. बिगर कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा चेस्ट एक्स-रे काढल्यास मयताच्या छातीचे काळे डाग आल्याचे दिसून येत आहे, असे साधारण एक हजार मृत्यूची आकडेवारी प्रशासनाकडून लपविण्यात आली आहे का, याबाबत महापौरांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमोर खुलासा केला आहे.

शहरात असे एक हजार संशयित मृत्यू झाले किंवा लपवले गेले, असे काही झालेले नाही, असे आयुक्तांनी ठामपणे सांगितले. याबाबत आपण महापौरांशी चर्चा करणार आहे. ससून सर्वोचपार रुग्णालयाकडे पत्र पाठवून माहिती घेतो, असेही स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे नागरिकांचे उत्पन्न थांबले आहे. खाजगी रुग्णालयात नागरिक दाखल होण्यास गेले असता त्यांच्यावरील उपचाराचा खर्च करण्यासाठी पैसे नसतात, ही वस्तुस्थिती असून त्यासाठी पुणे शहरातील सर्व नागरिकांचा, प्रत्येक मिळकत धारकाचा कोरोनाचा विमा किमान सहा महिन्यासाठी करावा.

त्या अंतर्गत उपचाराचा खर्च होवून यामुळे मनपाची आर्थिक बचत देखील होईल. सर्वसामान्य उपचारासाठी गेला असता त्यास जागा उपलब्ध होत नाही व विमा असणाऱ्यास जागा मिळते, ही वस्तुस्थिती शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर आयुक्तांनी याबाबत खातेप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेतो असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.