Pune : प्रत्येकाच्या आतील गांधी बाहेर आला तर हुकूमशाही भूईसपाट होईल- निखिल वागळे

एमपीसी न्यूज- 2014 नंतर देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण असून, नागरी स्वातंत्र्यांवर घाला येत आहे, या बेबंद सत्तेचा फटका प्रत्येकाला बसल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सर्वांनी विरोधात लोकशक्ती उभी केली पाहिजे, प्रत्येकाच्या मनातील गांधी जागृत होऊन असंतोष व्यक्त होईल, तेव्हा हुकूमशाही भूईसपाट होईल असे प्रतिपादन पत्रकार निखिल वागळे यांनी केले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ मध्ये ‘ अघोषित आणीबाणीचे आव्हान ‘ या विषयावर ते बोलत होते.

व्यासपीठावर डॉ.कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे उपस्थित होते.

निखिल वागळे म्हणाले, “आजूबाजूची परिस्थिती श्वास कोंडावा अशी आहे. नागरिकांचे मूलभूत, घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. इंदिरा गांधींनी बहुमत वापरुन घटनात्मक मार्गाने आणीबाणी आणली, आणि नागरी स्वातंत्र्यावर आघात केला. तशी आणीबाणी आणणे आता नेत्यांना शक्य नाही. आणीबाणीत माध्यमांनी अपवाद वगळता लढा दिला नव्हता, आताही माध्यमे अघोषित आणीबाणीत घाबरत आहेत. तेव्हाही अनेक आदरणीय मंडळी आणीबाणीयुक्त हुकूमशाहीच्या प्रेमात होती.आजही मध्यमवर्ग झोपलेला आहे. अवतीभवती काय घडते आहे, याची कल्पना त्याला येत नाही”

कॉंग्रेसच्या अनेक चुका घडत होत्या. मनमोहन सिंह राजकारणी म्हणून कमी पडले. म्हणून जनता मोदींच्या प्रेमात पडली.’स्ट्राँग ‘ वाटणाऱ्या नेत्याने प्रश्न सोडवले असते, तर हिटलरला आत्महत्या करावी लागली नसती. अंबानी सर्व पक्षांच्या सरकारांबरोबर होते, या सरकारबरोबर देखील आहेत. इतके की, एक दिवस या देशाचे नाव ‘ अंबानी इंडिया ‘ झाले तर आश्चर्य वाटणार नाही. २०१४ ची निवडणूक मोदी, क्रोनी कॅपिटलिस्ट आणि मीडियाने लढवली” असे वागळे म्हणाले.

“केवळ मोदीच नाही, तर फडणवीस पण सेन्सॉरशीप आणत आहेत. त्यांचे चॅनेलला फोन जात असतात. कॉंग्रेसच्या काळात दबाव येत असे, पण, ते नोकरीला हात लावत नव्हते. राणा अयूब, रवीश कुमार वर ट्रोलिंग होते. शिलाँगमध्ये संपादकाच्या घरावर पेट्रोल बॉंब टाकले गेले. काही पत्रकारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले. आता, पत्रकारांना सुरक्षितता राहिली नाही. आता ‘ प्रेस फ्रिडम ‘ नाही तर , ‘प्रेझ फ्रिडम ‘ आहे” अशी टीका वागळे यांनी केली.

गांधींबद्दल बोलताना वागळे म्हणाले, ‘गांधी हे बदलाला तयार असलेले व्यक्तिमत्व होते. स्वतंत्र भारतात गांधीवादी, आणि गांधी विरोधकांनीही गांधींचा खून केला, पण तरीही गांधी संपले नाहीत. गांधींवर टीका करता येते, हे त्यांचे मोठेपण आहे” असे वाचले म्हणाले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.