Pune : गणेशोत्सव होईपर्यंत महामेट्रोकडून रस्त्यावर नव्याने ब्रॅकॅटिंग नाही

गणेशोत्सवामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय

एमपीसी न्यूज- गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मेट्रोच्या कामामुळे गणेश मंडळांना मंडप उभारण्यास येणाऱ्या समस्यांचा विचार करून महामेट्रोने गणेश विसर्जनापर्यंत रस्त्यावर नव्याने कोणतेही ब्रॅकॅटिंग न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘रिच-२’ चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली.

गणेशोत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रातुन गणेशभक्त गणपती पाहण्यासाठी शहरात येतात. त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यंदाच्या वर्षी शहरात महामट्रोकडून कर्वे रॊड, पौड रोड, आयडीयल कॉलनी याठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी ब्रॅकॅटिंग करून मेट्रो मार्गाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

याच रस्त्यांवर गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळाचे मंडप टाकण्यात येतात. मेट्रोचे ब्रॅकॅटिंग आणि मंडप एकाचवेळी रस्त्यांवर टाकण्यात आल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे काही गणेश मंडळांनी महामेट्रोची भेट घेऊन ब्रॅकॅटिंग कमी जागेत करण्याची मागणी केली. मात्र ते शक्य नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. परंतु गणेश विसर्जनापर्यंत नव्याने महामेट्रोकडून ब्रॅकॅटिंग करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यावरील गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षी कमी जागेत मंडप टाकावेत अन्यथा मुख्यरस्ता सोडून अन्य ठिकाणी मंडप उभारणे शक्य असल्यास तो उभारावा असे आवाहन देखील महामेट्रोकडून गणेश मंडळांना करण्यात आले आहे.

मेट्रो जमीन अधिग्रहणासाठी समिती

मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये मेट्रोचे, महापालिकेचे अधिकारी असणार आहेत. महापालिकेकडून जमीन अधिग्रहणाच्या संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची देखील नेमणूक करण्यात आली असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.