Pune : शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तरीही नागरिकांनी दक्षता घ्यावी – आयुक्त

एमपीसी न्यूज – शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तरी देखील हा आजार होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात विलगीकरण विशेष कक्ष सुरू करण्यात आलेला असून अद्याप पर्यंत एकही रुग्ण आढळला नसल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी कळविले आहे.

करोना आजार हा नवीन असून त्याचे निदान करण्याची व्यवस्था पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत आहे त्यामुळे अशा संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी या विज्ञानसंस्थेत पाठविले जाणार आहेत व संशयित रुग्णांना नायडू रुग्णालय व मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करता येणार आहे, असे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

करोना आजाराची सर्वसामान्य लक्षणे –

-सर्दी,खोकला ( कॉमन कोल्ड )

– गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे
– श्वास घ्यायला त्रास होणे,श्वसनास अडथळा
– न्यूमोनिया

पचनसंस्थेची लक्षणे –
– अतिसार
– काही रुग्णामध्ये मूत्रपिंड निकामी होणे
– प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये असामान्य लक्षणे आढळू शकतात.

प्रतिबंधात्मक खबरदारी –

– श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तीचा निकट सहवास टाळणे.
– हाताची नियमित स्वच्छता.
– न शिजलेले अथवा अपुरे शिजलेले मांस खाऊ नये.
फळे, भाज्या न धुता खाऊ नये.
– खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल, टिशू पेपर वापर करावा
– असा वापर केलेले रुमाल, टिशू पेपर लगेच व्यवस्थित असलेल्या कचरापेटीत टाकावेत.

खालील व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा –

– श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती
– हा त्रास कोणत्या आजारामुळे, विषाणूमुळे होत आहे हे स्पष्ट होत नसल्यास
– रुग्णाने मध्य पूर्वेस नुकताच प्रवास केला असल्यास
– प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती
– ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणू बाधित देशात प्रवास केला आहे.

रुग्णास उपचार देणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सदर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो याकरिता रुग्णास उपचार करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचारी यांनी सुयोग्य संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण पद्धती वापर करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.