Pune : उत्पन्न वाढीसाठी नाट्यगृहांचे खासगीकरण नको : दीपाली धुमाळ

No need for privatization of theaters to increase income: Deepali Dhumal : उत्पन्न वाढीसाठी नाट्यगृहांचे खासगीकरण नको : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – नाट्यगृह हे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन किंवा मध्यम नाही. ही पुणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रम देण्याची सेवा आहे. प्रशासनाला उत्पन्न वाढविण्याची इच्छा असेल तर अनेक विभाग आहेत. त्या विभागाची वसुली करण्याकडे लक्ष द्यावे. उत्पन्न वाढीसाठी नाट्यगृहांचे खासगीकरण करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

नाट्यगृहांच्या खासगीकरणाच्या निर्णयामुळे सांस्कृतिक वसा जोपासलेल्या  तसेच सांस्कृतिक क्षेत्रात हयात घालविलेल्या कलावंतांचा अपमान आहे. त्यामुळे आमचा नाट्यगृहांच्या खाजगिकरणाला विरोध असल्याचे विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांनी सांगितले.

त्या संदर्भात त्यांनी नाराजी दर्शविणारे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.

नाट्यगृहांच्या खाजगिकरणामुळे महापालिकेचे अस्तित्व संपून ठेकेदाराला महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे मनमानी कारभार सुरू होईल. स्थानिक नाट्य संस्था आणि कलावंतांना नाट्यगृहांत कार्यक्रम राबविण्यासाठी सध्याची सोयीस्कर पध्दत बंद होईल.

नाट्यगृहातील शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या तारखा मिळण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी येतील. या तारखा खाजगी कार्यक्रम करणाऱ्या संस्थेकडून जादा रक्कम घेऊन त्यांना देण्यात येतील, अशी भीती धुमाळ यांनी व्यक्त केली आहे.

खासगीकरणातून ठेकेदार मंडळी जास्त रक्कमेचे तिकीट असलेले कार्यक्रम आयोजित करतील. त्यामुळे रसिक प्रेमींची गैरसोय होईल.

साफसफाई किंवा इतर गोष्टी खाजगी संस्थांकडून नीट सांभाळल्या गेल्या नाहीत तर त्यांना जाब कोण विचारणार? नाट्यगृहांच्या विकासासाठी पुणे महापालिकेला लक्ष घालावे लागणार असेल तर खाजगिकरण करण्याचा हा कुटील डाव का? असे अनेक सवाल दीपाली धुमाळ यांनी उपस्थित केले आहेत.

नाट्यगृहांचे खाजगिकरण झाल्यास पूर्णपणे ठेकेदारांची दुकानदारी होण्याची भीतीही त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.