
Pune : संपूर्ण अर्थव्यवस्था नाही तर, तिच्या वाढीचा दर मंदावला – प्रदीप आपटे

एमपीसी न्यूज – देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था मंदावली नाही तर अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर काहीसा मंदावला आहे. मंदीची झळ बँक आणि बांधकाम क्षेत्राला आहे, अन्य क्षेत्राला नाही. असे मत जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. प्रदीप आपटे यांनी व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या वतीने आयोजित ‘बजेट २०२० – एक परिसंवाद’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

गेली काही वर्षे मंदी आहे असे बोलले जात आहे. पण हा कालावधी गेल्या दोन-तीन वषार्चा नाही तर साधारणपणे २०११ पासून कमी अधिक प्रमाणात ही मंदीची स्थिती जाणवत आहे. खासगी गुंतवणुकीचा वेग कमी होत गेला. त्यातुलनेत ज्या उपाययोजना होणे अपेक्षित होते त्यामानाने अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. महसुली खर्चात वाढ होत गेली. आपल्या देशात अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे कारण एका अर्थाने सरकारच्या जमा -खचार्चा तो आराखडा आहे. यातील काही बाबी या सर्वसामान्य जनतेशी निगडित आहेत त्यामुळे त्याचे महत्व आहे. असे आपटे म्हणाले.

या प्रसंगी बोलताना चितळे म्हणाले,अर्थसंकल्पातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रस्तावाबाबत जनतेला कुतूहल असते. अन्य तरतुदींपेक्षाही आयकराबाबत विशेष उत्सुकता असते. प्रगत देशात अर्थसंकल्पाबाबत फारशी उत्सुकता नसते कारण त्या त्या देशातील अर्थव्यवस्था ही सक्षम आहे आणि आपली अर्थव्यवस्था त्या दिशेने वाटचाल करीत आहे. लोकप्रतिनिधीनी अर्थसंकल्पाचा अधिक गांभीर्याने आभ्यास करण्याची गरज आहे.
सीए बागूल यांनी शेअर बाजार आणि अर्थसंकल्प यामधील नेमका संबंध स्पष्ट केला. खर्च आणि उत्पन्न यातील तफावत याचा परिणाम शेअर मार्केटवर होत असतो. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाकडून असणा-या अपेक्षांचा भंग झाला की त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होत असतो, असे ते म्हणाले. अॅड. नितीन शर्मा यांनी लघु व मध्यम उद्योगासाठीच्या सरकारी योजना, करसवलती, जीएसटी करप्रणाली याबाबत माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता शेटीया यांनी केले तर प्रास्ताविक जगदीश धोंगडे यांनी केले .
