Pune: ‘मिशन बिगीन अगेन’ बाबत अधिसूचना जाहीर -जिल्हाधिकारी        

0

एमपीसी न्यूज – कोविड- 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊन ची घोषणा यापूर्वी केलेली असून, त्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ (MISSION BEGIN AGAIN) बाबत अधिसूचना जाहीर केली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश जारी केले आहे. 

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.  राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2020पर्यंत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेतील परिशिष्ठ 1,2, व 3 मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शासन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात खालील प्रमाणे लागू करण्यात आली आहे.  हे आदेश दि.2 ऑगस्ट 2020 ते दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहतील आणि सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केले आहे.

शासन अधिसूचना सुधारणा पुढीलप्रमाणे –

पुणे महानगरपालिका क्षेत्र :- पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

पुणे व खडकी छावणी परिषद :- पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

देहूरोड छावणी परिषद :– देहूरोड छावणी परिषद क्षेत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहुरोड छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

वरील प्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी राहील.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय साथ अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता चे कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like