Pune : खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गँग एलसीबीच्या जाळ्यात

The notorious Mama Gang LCB in the Khadakwasla shooting case

एमपीसी न्यूज – खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गँगला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. या गँगने खंडणीच्या कारणावरून 17 मे रोजी खडकवासला येथील एका घरावर अंदाधुंद गोळीबार केला होता.

चेतन उर्फ मामा गोविंद लिमण (वय 28, रा. खडकवासला), किरण महेंद्र सोनवणे (वर 23, रा. किरकिटवाडी, ता. हवेली), दिगंबर दिपक चव्हाण (वय 21, रा. किरकिटवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

विजय उर्फ खंडू लक्ष्मण चव्हाण असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार प्रकरणी राजू चंदू सोनवणे (वय 35, रा. खडकवासला) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी मामा फिर्यादी सोनवणे यांच्याकडून चार महिन्यांपासून खंडणी वसूल करत होता. 17 मे रोजी मामा याने तीन जणांना सोनवणे यांच्याकडे पाठवून आणखी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र, सध्या कामधंदा नसल्याने सोनवणे यांनी पैसे देण्यास नकार दिला.

सोनवणे यांनी नकार दिल्यानंतर खंडणी मागण्यासाठी आलेल्या तिघांनी सोनवणे यांना ठार मारण्याची धमकी दिली आणि ते निघून गेले.

काही वेळेनंतर मामा त्याच्या पाच साथीदारांना घेऊन आला. सोनवणे आणि त्यांचे साथीदार जखमी विजय चव्हाण यांच्या घरासमोर येऊन अंदाधुंद गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या गोळीबारात विजय चव्हाण यांच्या डोळ्यावर गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवेली पोलीस घटनेचा तपास करत असताना एलसीबीने समांतर तपास केला.

एलसीबीच्या पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी मामा त्याच्या साथीदारांसोबत डोणजे येथे फिरत आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी मामा आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपी तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली.

आरोपी मामा याच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत. तर 5 गुन्ह्यात तो फरार आहे. आरोपी किरण सोनवणे याच्यावर 5 गुन्हे दाखल असून 3 गुन्ह्यात तो फरार आहे. आरोपी दिगंबर चव्हाण याच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

मामा गँगने हवेली परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. या गँगला पोलिसांनी अटक केली आहे. या गँगने कोणाला त्रास दिला असेल तर संबंधित नागरिकांनी न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,

सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, दिलीप जाधवर, शब्बीर पठाण, मुकुंद आयाचित, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, लियाकत मुजावर, रौफ इनामदार, धीरज जाधव, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.