Pune : विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन परिचारिकेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने (Pune)  विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने दुचाकी घेण्यासाठी परिचारिका युवतीकडे पैशांची मागणी करत मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. पोलिसांनी प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

अश्विनी देवीदास राठोड (वय 21, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या परिचारिक युवतीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर बापू किसन मैद (वय 22, रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीचे वडील देवीदास राठोड (वय 54, रा. चिखलठाणा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किसन मैद आणि अश्विनी राठोड यांनी कन्नड येथील एका संस्थेतून परिचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघे जण पुण्यात नोकरीसाठी आले. अश्विनी लोहगाव भागातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती.
किसनने तिच्याकडे नवीन दुचाकी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अश्विनीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो तिला शिवीगाळ करुन त्रास देता. किसनच्या त्रासामुळे अश्विनीने विषारी औषधांची इंजेक्शन टोचून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अश्विनीचा प्रियकर किसन याच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचे वडील देवीदास राठोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.