Pune : जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफने घेतला आंदोलनाचा पावित्रा

Pune: Nursing staff on the streets against the administration of Jehangir Hospital

एमपीसी न्यूज – कोविड आणि नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असलेले पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल व्यवस्थापन नर्सिंग स्टाफसोबत अन्यायकारक वर्तन करत आहे, असा आरोप करत नर्सिंग स्टाफ जहांगीर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरला आहे. सुमारे 300 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मागील चार महिन्यांपासून हॉस्पिटल व्यवस्थापन अन्याय करत असल्याने नर्सिंग स्टाफ आक्रमक झाला आहे. नर्सिंग स्टाफला पगार कमी देणे, कुलिंग टाईम न देणे, 12 तासांची ड्यूटी लावणे, काम करण्याची सक्ती करणे असे अन्यायकारक वर्तन हॉस्पिटल व्यवस्थापन नर्सिंग स्टाफसोबत करत आहे.

कर्मचारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. काही जणांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांचा राजीनामा देखील स्वीकारला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.

हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना होस्टेलवर येऊन धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप देखील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मानव संसाधन विभाग (एच आर) कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या या अन्यायकारक जाचातून मुक्त करण्याची मागणी हे कर्मचारी करीत आहेत.

यासंदर्भात रुग्णालय व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही. रुग्णालय व्यवस्थापनाची बाजू समजल्यानंतर ती या बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.